गांधीजींच्या कार्यपद्धतींमागचे विज्ञान - डॉ. अभय बंग

         प्रचलित पद्धतीअनुसार शास्त्रज्ञांचे ज्ञान हे त्यांची वैयक्तिक मालमत्ता मानले जाते. गांधीजींच्या दृष्टीने विज्ञानाचा आणि संशोधनाचा उद्देश आणि त्यातून निर्माण झालेल्या ज्ञानाची मालकी हे प्रचलितापेक्षा वेगळे आहे. ते म्हणत, ‘‘माझे आश्रम हे गावासाठीच्या आणि सामाजिक पुनर्रचनेच्या प्रयोगशाळा झाल्या पाहिजेत.’’ ग्रामोद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी ऑल इंडिया व्हिलेज इंडस्ट्रीज असोसिएशनची स्थापना केली. या असोसिएशनच्या सल्लागार मंडळातील सर सी.व्ही. रमण, जगदीशचंद्र बोस आणि पी.सी. रे ही तीन नावे तुमच्या चांगल्याच परिचयाची असतील. हे त्या काळातले भारतातील तीन सर्वोत्तम शास्त्रज्ञ होते. त्यांना गांधीजींनी त्यांच्या ग्रामोद्योगाच्या सल्लागार मंडळावर काम करण्यासाठी आमंत्रित केले. नंतर गांधीजींनी ‘सत्याग्रही वैज्ञानिक’ असा अतिशय अर्थपूर्ण शब्द तयार केला.


.......................................................

        गांधी आणि विज्ञान ह्या मालिकेमध्ये भाषण करण्यासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल मी इंडियन ॲकॅडमी ऑफ सायन्स आणि त्याचे अध्यक्ष प्रा.पार्थ मजुमदार यांचे आभार मानतो. इथे भाषण करण्याची संधी मिळणे हा मला सन्मान वाटतो. माझ्या भाषणाचे शीर्षक आहे, ‘गांधीजींच्या कार्यपद्धतींमागचे विज्ञान’.
        न्यू यॉर्कमधील ‘टाइम’ साप्ताहिकाच्या कार्यालयापासून आपण सुरुवात करू. 1999 चा डिसेंबर महिना आहे, म्हणजे विसाव्या शतकाच्या अखेरीचा काळ. ‘टाइम’ला 20 व्या शतकातील सर्वांत लोकप्रिय महान व्यक्तीची निवड करायची आहे. विविध क्षेत्रांतल्या अनेक व्यक्तींची नावे सुचवण्यात आली आहेत, पण अल्बर्ट आइनस्टाईन आणि महात्मा गांधी ही दोन नावे सर्वांत जास्त लोकप्रिय ठरत आहेत. संपादकांपुढे निवड करण्याचा पेच निर्माण झाला.
        अखेर त्यांनी विसाव्या शतकातील सर्वांत लोकप्रिय महान व्यक्ती म्हणून आइन्स्टाईनची निवड केली. विज्ञानाने आणि वैज्ञानिकाने गांधींवर विजय मिळवला- पण लोकप्रियतेच्या बाबतीत. शिवाय, तो 20 व्या शतकातला निर्णय होता. आज एकविसाव्या शतकात विज्ञान आणि गांधी यांच्यातील संबंध पुन्हा एकदा तपासून पाहण्याची आणि आपल्या निर्णयावर येण्याची गरज आहे. मी या व्याख्यानात तेच करण्याचा प्रयत्न करणार आहे. आज मी स्वत:बद्दल किंवा मी केलेल्या कामाबद्दल मुळीच बोलणार नाही. कारण गांधीजी आणि विज्ञान यांच्यातील परस्पर संबंध हा विषय माझ्या स्वतःच्या कामाबद्दल बोलण्यापेक्षा जास्त वेधक वाटतो!
सहा प्रश्न
हा शोध घेण्यासाठी मी सहा प्रश्न निर्धारित केले आहेत.
1. गांधी विज्ञानविरोधी होते का?
2. त्यांचा विज्ञानाशी संबंध कसा होता?
3. त्यांचे वेगळेपण काय आहे?
4. त्यांच्या अहिंसेमागे कोणते विज्ञान होते?
5. सत्य जाणून घेण्याची गांधींची पद्धत कोणती होती?
6. एकविसाव्या शतकात आपल्याला गांधीजी कशा प्रकारे समयोचित आणि उपयुक्त आहेत?
        ‘गांधीजी विज्ञानविरोधी होते’, या त्यांच्यावरील आरोपापासून आपण सुरुवात करू या. तसेच विज्ञानाशी असलेल्या त्यांच्या संबंधाचाही शोध घेऊ. पण त्यांच्या पद्धती काय होत्या याचा अधिक सखोलपणे विचार करू आणि शेवटी, आज त्यांचे विचार आपल्याला समयोचित असलेच तर ते कसे- याचाही धांडोळा घेऊ.
        सुरुवातीला मला हे सांगितले पाहिजे की, मी एका गांधीवादी कुटुंबात जन्माला आलो आणि गांधीजींच्या आश्रमात वाढलो आहे. त्यांनी स्वतः सुरू केलेल्या शाळेतच मी शिकलो. वयाच्या अठराव्या वर्षी मी वैद्यकशास्त्राचा अभ्यास सुरू केला आणि त्यानंतर सार्वजनिक आरोग्य या विषयाचाही अभ्यास केला. गेल्या 35 वर्षांपासून मी वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य या विषयांवर कार्य व संशोधन करत आहे. साधारणत: पन्नास वर्षांपूर्वी माझी विज्ञानाशी ओळख झाली तेव्हापासून विज्ञानाच्या प्रश्नावर महात्मा गांधींशी माझे एक विचित्र नाते आहे. कधी त्यांच्या विचारांची मला लाज वाटली, कधी माझा गोंधळ झाला, तर कधी मला रागसुद्धा आला. विज्ञानाच्या मुद्द्यावरून माझे त्यांच्याशी मानसिक पातळीवर अनेक वाद झाले आहेत; मतभेदसुद्धा झाले आहेत. आणि आज मला सांगायला आनंद वाटतो की, प्रत्येक वेळी मी हरलो आणि ते जिंकले! गांधींजींच्या सोबतचा हा 50 वर्षांचा संघर्ष, तसेच विज्ञान आणि गांधीजी यांच्या परस्पर संबंधांचा शोध घेण्याचा माझा प्रवास आज मी तुमच्या समोर मांडणार आहे.
        गांधींजींचे स्वत:चे लिखाण, त्यांच्या अनेक चरित्रकारांनी केलेले वर्णन आणि गांधीजींचे अग्रगण्य शिष्य विनोबा भावे यांचे विचार या सगळ्यांचा आधार घेऊन ही मांडणी मी करणार आहे. तसेच सुमारे 20 वर्षांपूर्वी श्री.शंभूप्रसाद यांनी इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकलीमध्ये लिहिलेल्या एका सुंदर लेखाचा आणि अर्थातच माझ्या स्वत:च्या आयुष्यातील अनुभवांचा आणि प्रयोगांचाही मी आजच्या भाषणात उपयोग करणार आहे.
गांधीजी विज्ञानविरोधी होते का?
        जवाहरलाल नेहरू व रवींद्रनाथ टागोर, हे त्यांच्या इतक्या जवळचे होते त्यांनी आणि पाश्चिमात्य देशांतील ऑल्डस हक्सले यांच्यासारख्या लोकांनीही गांधींवर विज्ञानविरोधी असल्याचा आरोप केला आहे. भारताच्या राष्ट्रीय विज्ञान धोरणाचे शिल्पकार- डॉ.मेघनाद साहा म्हणतात, ‘आधुनिक वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा त्याग करून आणि चरखा, पंचा आणि बैलगाडीकडे वळल्यामुळे अधिक चांगली आणि आनंदी परिस्थिती निर्माण होऊ शकते यावर आमचा कणभरही विश्वास नाही.’ (1)
        या वाक्याचा रोख महात्मा गांधीजींच्या धोरणांवर आणि त्यांनी चरखा, पंचा आणि बैलगाडीसारखी जी प्रतीके वापरली त्यावर आहे ते तर उघडच आहे. मेघनाद साहा, जवाहरलाल नेहरू आणि एकूणच भारतातील बुद्धिजीवी वर्ग असे मानतो की ‘गांधी विज्ञानविरोधी होते; म्हणून आजच्या काळात गांधीजी मोठ्या प्रमाणावर अप्रस्तुत ठरतात’ असे त्यांना वाटते. असा समज होण्यासाठी आंशिकरीत्या स्वत: गांधीजीदेखील जबाबदार आहेत.
        आपण ज्याला ‘विज्ञान’ मानतो अशा काही गोष्टींवर ‘हिंद स्वराज’ या पुस्तकामध्ये गांधीजींनी कठोर टीका केली आहे. हे पुस्तक त्यांच्या आत्मचरित्रानंतर सर्वांत महत्त्वाचे मानले जाते. पण सावधान! त्यांनी विज्ञानावर टीका केलेली नसून आधुनिक विज्ञानातून तयार झालेली काही यंत्रे आणि वैद्यकीय पद्धती यांसारख्या काही बाबींवर त्यांचा आक्षेप आहे. पण त्यामुळे आपल्याला ते विज्ञानविरोधी वाटू शकतात. शिवाय, त्यांची प्रार्थनेवरची श्रद्धा आणि त्यांचे रामनाम; यामुळे तर आपल्या बुद्धिवादीपणाच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखेच वाटू शकते. या सगळ्यांमुळे स्वत:ला विज्ञानवादी आणि बुद्धिनिष्ठ मानणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला गांधी हे अगदीच विरुद्ध टोकाचे आहेत असे वाटू शकते. आणि म्हणूनच त्यांना सोईस्करपणे ‘विज्ञानविरोधी’ असे लेबल लावले जाते.
        पण 1921 मध्ये नवी दिल्लीतल्या टिब्बिया कॉलेजच्या उद्‌घाटनप्रसंगी ते वैज्ञानिकांबद्दल काय म्हणाले आहेत बघा! त्या व्याख्यानात गांधीजी म्हणतात की सत्याच्या शोधात मग्न झालेल्या आधुनिक शास्त्रज्ञांचा उत्साह, त्यांची मेहनत आणि त्याग यांबद्दल माझ्या मनात फक्त आदर व कौतुकाचीच भावना आहे.(2)
        गांधीजींना वैज्ञानिक वृत्तीचे, वैज्ञानिक संशोधन पद्धतीचे खूप कौतुक होते. त्यांचे स्वत:चे प्रत्यक्ष जीवन हाच त्याचा वास्तविक पुरावा आहे. ते स्वतःच म्हणायचे की माझे जीवन हाच माझा संदेश! म्हणून आपल्याला खरीखुरी तपासणी करायची असेल तर त्यांच्या विधानांच्या पलीकडे जाऊन ते कसे जगले आणि वागले हे आपण पाहिले पाहिजे. जर आपण तसे पाहायला लागलो, तर त्यांना आयुष्यभर आरोग्य, आहार, स्वच्छता, रोगजंतू, व्यायाम अशा विविध वैज्ञानिक मुद्द्यांबद्दल किती कुतूहल होते ते आपल्या लक्षात येईल. त्यांना विविध प्रकारच्या पदार्थांचे रासायनिक विश्लेषण जाणून घ्यायचे असे. मायक्रोस्कोपसह त्यांचे छायाचित्र प्रसिद्धच आहे. त्या वेळी ते कुष्ठरोग निर्माण करणारा जीवाणू पाहण्याचा प्रयत्न करत होते. येरवडा कारागृहात असताना 1942 नंतर त्यांना दुर्बिणीची भुरळ पडली आणि त्यांनी आकाश दर्शनाचा छंद जोपासला. एकूण, गांधीजींनी वैज्ञानिक साधने आणि वैज्ञानिक पद्धतींचा मोकळ्या मनाने वापर केला.
        पण शब्द व कृतींपेक्षाही अधिक संवेदनशील आणि कठीण भाग असतो वृत्तीचा! आपण जर काळजीपूर्वक बघितले तर आपल्या लक्षात येईल की गांधीजींची प्रयोग करण्याची, पुरावे शोधण्याची तयारी आणि स्वतःमध्ये बदल घडवणे, सुधारणा करत राहण्याची वृत्ती हे सगळे शास्त्रज्ञाचे गुणधर्म आहेत. त्यांचे एक विधान तर अतिशय प्रसिद्धच आहे! ते म्हणत, ‘‘जर एखाद्या वाचकाला माझी दोन विधाने परस्परविरोधी असल्याचे आढळले तर माझे नंतरचे विधानच योग्य समजावे.’’
        आपले पूर्वीचे मत चुकीचे होते आणि नवे मत हे नव्याने झालेल्या जाणिवेवर आधारित आहे असे कुठलेही राजकीय नेते किंवा संत सहसा मान्य करत नाहीत. उलट आपण कधीही बदलत नसल्याचा त्यांना अभिमान असतो. मात्र गांधीजी या बाबतीत एखाद्या शास्त्रज्ञासारखे आहेत. ते जणू काही असे म्हणतात की, ‘मी बदलतो. जर वेगळे पुरावे समोर आले, तर मी माझे मत बदलतो.’
        एकदा प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ जॉन मेनार्ड केन्स यांच्यावर एका राजकारण्याने आरोप केला की, त्यांनी पूर्वी वेगळेच काहीतरी सांगितले होते; आता ते बदलले. तेव्हा केन्सने उत्तर दिले, ‘‘होय महाशय, जर तथ्य बदलले तर मी माझे मत बदलतो. तुम्ही वेगळे काय करता?’’
        त्या दृष्टीने गांधी हे अगदी एखाद्या वैज्ञानिकासारखे आहेत. त्याचा सर्वांत मोठा पुरावा म्हणजे चौरीचौराची घटना. आपण नुकतीच चौरीचौराच्या घटनेची शंभरी साजरी केली. (पण सरकारने ते चुकीच्या कारणांसाठी केले). महात्मा गांधींनी 1920 मध्ये राष्ट्रीय असहकार चळवळ सुरू केली तेव्हा भारत अहिंसक राष्ट्रीय चळवळीसाठी सज्ज आहे, असा त्यांना विश्वास वाटत होता. पण 1921 मध्ये उत्तर प्रदेशात जमावाने चौरीचौरा येथील पोलिस स्टेशन जाळले आणि 22 पोलिस ठार झाले. तेव्हा गांधीजींना धक्काच बसला. त्यांनी जाहीरपणे म्हटले की, ‘‘मी हिमालयाएवढी प्रचंड मोठी चूक केली. भारतीय लोक अहिंसक आंदोलनासाठी तयार आहेत हा माझा समज चुकीचा ठरला.’’
        एखाद्या शास्त्रज्ञाने म्हणावे की, माझे जे गृहीतक होते, त्याचे प्रत्यक्ष पुराव्यांनी खंडन झाले आहे आणि मला ते मान्य केले पाहिजे- तसे गांधीजींचे हे म्हणणे आहे. ते म्हणत होते की, ‘‘माझे गृहीतक चुकीचे असल्याने, मी ते सोडले पाहिजे आणि स्वतःची भूमिका सुधारली पाहिजे. त्यामुळे मी संपूर्ण राष्ट्रीय आंदोलन मागे घेत आहे.’’
       महात्मा गांधींच्या सार्वजनिक जीवनातील हा सर्वांत जोखमीचा क्षण होता. ते नुकतेच भारतात राष्ट्रीय नेते म्हणून प्रस्थापित झाले होते. अशा वेळी संपूर्ण देशाच्या मताच्या विरोधात जाऊन त्यांनी राष्ट्रीय आंदोलन मागे घेतले आणि स्वत:चे नेतृत्वपद धोक्यात आणले.
        हे तर निखळ शास्त्रज्ञाचे गुणधर्म आहेत. केवळ राष्ट्र हीच त्यांची प्रयोगशाळा नव्हती, तर गांधीजींनी स्वत:वरही प्रयोग केले. त्यांचे ब्रह्मचर्याचे प्रयोग तर प्रसिद्धच आहेत; एक प्रकारे कुप्रसिद्धही आहेत. ‘मी ज्यापासून मुक्त होऊ इच्छितो अशा लैंगिक वासनांचा माझ्यामध्ये काही अंश उरला आहे का? जर मी खरोखर अहिंसक असेन किंवा मी जर तथाकथित संत अथवा महात्मा असेन, तर मी लैंगिक इच्छांपासून, वासनांपासून पूर्णपणे मुक्त असले पाहिजे. तसा मी आहे का?’ हे पडताळून बघण्यासाठी ते स्वतःवर प्रयोग करत असत. आपले शरीर आणि मन यांच्यातील खोलवर दडलेल्या वासनांचा शोध घेण्यासाठी त्यांनी स्वत:वर सर्वांत अवघड आणि जोखमीचा प्रयोग केला. या प्रयोगामुळे गांधींबद्दल बरेच गंभीर गैरसमज आहेत आणि त्यांच्यावर टीकादेखील झाली आहे.
        पण जेव्हा मी याबद्दल वाचले तेव्हा मला जॉन हंटर या नावाची आठवण झाली. सुमारे 200 वर्षांपूर्वी जॉन हंटर हा एक प्रसिद्ध शरीरशास्त्रज्ञ होऊन गेला. सिफिलीसचा संसर्ग कसा होतो हे शोधण्यासाठी त्याने स्वतःवर एक धाडसी प्रयोग केला. त्याने सिफिलीसच्या रुग्णाच्या फोडातून काही द्रव काढून घेतला आणि आपल्या लिंगावर टोचून घेऊन स्वत:चे निरीक्षण केले. काही आठवड्यांत तिथे सिफिलिटीक अल्सर विकसित झाला आणि त्यावरून सिफिलीस रोग कसा लैंगिक संबंधातून संक्रमित होतो ते त्याने सिद्ध केले. गांधीजींचा स्वतःवरचा ब्रह्मचर्याचा प्रयोगदेखील जॉन हंटरच्या प्रयोगाइतकाच धाडसी होता. तो त्यांनी दडवून ठेवला नाही. त्यांनी त्याबद्दल जाहीरपणे लिहिले.
    त्यांनी आत्मचरित्राला ‘माझे सत्याचे प्रयोग’ असे शीर्षक दिले यात आश्चर्य नाही. सत्य समजून घेणे हे त्यांचे अंतिम ध्येय होते. हे सर्व खऱ्या शास्त्रज्ञाचे गुण आहेत. ते जीवनाचे शास्त्रज्ञ होते.
त्यांचा विज्ञानाशी संबंध कसा होता?
    आता आपण पुढच्या प्रश्नाकडे येऊ. गांधीजी जर विज्ञानविरोधी नव्हते तर त्यांनी विज्ञानाचा कसा उपयोग केला? ते विज्ञानाशी कशी सांगड घालत असत?
    गांधींचे रचनात्मक कार्यक्रम ग्रामीण विकासाचे विविध कार्यक्रम आणि सामाजिक सुधारणा यांमध्ये त्यांनी केलेला विज्ञानाचा उपयोग आणि त्यांचे विज्ञानाशी असलेले नाते आपण पाहू शकतो.
    गांधीजींच्या रचनात्मक कार्यक्रमांमध्ये खादी आणि चरखा हे सर्वांत महत्त्वाचे होते. खेड्यातल्या सामान्य विणकराला जास्त चांगले कापड तयार करता यावे, अधिक रोजगार मिळावा आणि लोकांनी जास्त खादी वापरावी म्हणून खादीमध्ये सुधारणा करण्यासाठी गांधीजींनी वैज्ञानिक पद्धती वापरल्या. अधिकाधिक चांगली तांत्रिक साधने शोधली. त्यांनी ‘खादी सायन्स’ असा शब्दही वापरला आहे. चरख्याला ते एक उत्कृष्ट आणि उच्च प्रतीचे यंत्र म्हणत. आज यावर विश्वास ठेवणे कठीण आहे, परंतु सुमारे 80 वर्षांपूर्वी अधिक कार्यक्षम चरखा शोधून काढण्यासाठी गांधींनी एक लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर केला होता. कदाचित आज त्याची किंमत काही कोटी रुपये होईल.
    विज्ञानाचा उपयोग गांधीजी भरपूर प्रमाणात करीत, असे आपल्याला आढळते. तसेच ते आपल्या खादी क्षेत्रातील कार्यकर्त्यांकडूनही वैज्ञानिक वृत्तीची अपेक्षा करतात. ते काय म्हणतात बघा- ‘खादीच्या विज्ञानाला उच्च दर्जाचे तांत्रिक आणि यांत्रिक कौशल्य आवश्यक आहे. सर जगदीशचंद्र बोस यांनी त्यांच्या प्रयोगशाळेतील वनस्पतींच्या छोट्याशा पानांकडून निसर्गाची रहस्ये समजून घेण्यासाठी जितकी एकाग्रता वापरली तशा एकाग्रतेची आवश्यकता आहे.’(3)
    आणखी एका ठिकाणी ते म्हणतात, ‘माझ्या कल्पनेतील योजनेअनुसार आपल्याकडे भरपूर उत्तमोत्तम ग्रंथालये, प्रयोगशाळा आणि संशोधन संस्था असाव्यात. त्या अंतर्गत आपल्याकडे केमिस्ट, अभियंते आणि इतर तज्ज्ञांची फौज असली पाहिजे. ते राष्ट्राचे खरे सेवक असतील आणि लोकांच्या विविध आणि वाढत्या गरजांना उत्तरे देतील. त्यांनी मिळवलेले ज्ञान ही सर्वांची सार्वजनिक मालमत्ता असेल.’ (4)
    ते वैज्ञानिकांना राष्ट्राचे खरे सेवक म्हणतात आणि लोकांच्या विविध आणि वाढत्या गरजांसाठी वैज्ञानिक उपाय देतील, असे सांगतात. यातले शेवटचे वाक्य महत्त्वाचे आहे. शास्त्रज्ञ आणि संशोधनाच्या संस्था कशासाठी? ‘त्यांनी मिळवलेले ज्ञान ही सार्वजनिक मालमत्ता असेल,’ हे गांधीजींचे वक्तव्य प्रचलित बौद्धिक संपदा हक्क आणि पेटंटपेक्षा अगदी वेगळे आहे. प्रचलित पद्धतीअनुसार शास्त्रज्ञांचे ज्ञान हे त्यांची वैयक्तिक मालमत्ता मानले जाते. गांधीजींच्या दृष्टीने विज्ञानाचा आणि संशोधनाचा उद्देश आणि त्यातून निर्माण झालेल्या ज्ञानाची मालकी हे प्रचलितापेक्षा वेगळे आहे.
    ते म्हणत, ‘‘माझे आश्रम हे गावासाठीच्या आणि सामाजिक पुनर्रचनेच्या प्रयोगशाळा झाल्या पाहिजेत.’’ ग्रामोद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी ऑल इंडिया व्हिलेज इंडस्ट्रीज असोसिएशनची स्थापना केली. या असोसिएशनच्या सल्लागार मंडळातील सर सी.व्ही. रमण, जगदीशचंद्र बोस आणि पी.सी. रे ही तीन नावे तुमच्या चांगल्याच परिचयाची असतील. हे त्या काळातले भारतातील तीन सर्वोत्तम शास्त्रज्ञ होते. त्यांना गांधीजींनी त्यांच्या ग्रामोद्योगाच्या सल्लागार मंडळावर काम करण्यासाठी आमंत्रित केले.
    नंतर गांधीजींनी ‘सत्याग्रही वैज्ञानिक’ असा अतिशय अर्थपूर्ण शब्द तयार केला. त्यांचा आदर्श विधायक कार्यकर्ता, स्वातंत्र्य सैनिक, राजकीय कार्यकर्ता किंवा आश्रमवासी हा ‘सत्याग्रही वैज्ञानिक’ असावा; असे त्यांना वाटत असे. त्याचा अर्थ काय होता? तर कार्यकर्ता हा सत्याग्रही असावा, म्हणजेच सत्याचा अहिंसक साधक असावा, पण त्याच सोबत, त्याची वृत्ती, त्याच्या पद्धती, आणि प्रयोग हे वैज्ञानिक असले पाहिजेत, अशी त्यांची धारणा आहे. 1940 मधील व्यक्तिगत सत्याग्रह चळवळीसाठी त्यांनी केलेली पहिल्या सत्याग्रहीची निवड अतिशय महत्त्वाची होती. त्यांनी जवाहरलाल नेहरूंना देशाचे पहिले सत्याग्रही म्हणून निवडले नाही. तर त्यांची पहिली पसंती विनोबा भावे यांना होती. त्या वेळी विनोबा फारसे प्रसिद्ध नव्हते. पण त्यांनी विनोबांची निवड केवळ त्यांच्या आध्यात्मिक गुणांसाठीच नव्हे तर त्यांच्या वैज्ञानिक वृत्तीसाठीही केली. विनोबांनी खादी आणि चरख्यावर अभूतपूर्व काम केले होते.
    एका घटनेतून गांधींबद्दल आणि त्यांनी विनोबांची निवड करण्याबद्दल बरेच काही लक्षात येईल. खादीतील सूतकताई करणाऱ्या ‘कत्तिन’ कामगारांनी त्यांची मजुरी अत्यंत तुटपुंजी असल्याची तक्रार महात्मा गांधींकडे केली. खादी ही यंत्रनिर्मिती नव्हती, त्यामुळे आर्थिक दृष्ट्या तसे होणे साहजिकच होते. त्यात हाताने कताई आणि विणकामाचा समावेश होता. त्यामुळे उत्पादनाचा वेग कमी होता. पण प्रत्येकाला खादी परवडली पाहिजे म्हणून कापडाच्या किमती कमी ठेवाव्या लागत. त्यामुळे मजुरीचा दर कमी होता. पण जेव्हा मजुरांनी तक्रार केली तेव्हा गांधीजी म्हणाले की, आपण मजुरांवर अन्याय करू शकत नाही. म्हणून त्यांनी विनोबांना बोलावून खादीतील मजुरांसाठी किमान वेतन सुचवण्यास सांगितले. विनोबांनी थोडा वेळ मागून घेतला.
    विनोबा सहा महिन्यांनी परत आले, तेव्हा त्यांचे वजन 30 पौंडांनी कमी झाले होते. ते पाहून गांधीजींना काळजी वाटली. त्यांनी विचारले, ‘विनोबा, काय झालंय?’ तेव्हा विनोबा म्हणाले - ‘मी गेले सहा महिने फक्त सूतकताई हेच काम करतोय. आपण स्पिनरला जे वेतन देतो त्या दराने मी दररोज दोन आणे कमवू शकतो आहे. (दोन आणे म्हणजे रुपयाचा आठवा भाग) या दोन आण्यांत जेवढे अन्न येईल, तेवढ्यातच मी माझी भूक भागवतो. सध्याच्या वेतनामुळे माझे हे असे झाले आहे.’
विनोबांनी स्वतःवरच प्रयोग केला होता; ते स्वत:च एक प्रयोगशाळा बनले होते!
    थोडक्यात, गांधींनी त्यांच्या रचनात्मक कार्यात उत्साहाने आणि उदार मताने विज्ञान, वैज्ञानिक पद्धती आणि शास्त्रज्ञांचे स्वागत केले आणि त्यांचा उपयोग केला. आणि लक्षात घ्या, त्यांचे रचनात्मक कार्य त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे होते. त्यांनी इतरत्र म्हटल्यानुसार ‘अखेर रचनात्मक कार्यक्रमांची परिपूर्णता म्हणजे स्वराज्य, स्वातंत्र्य आणि स्वायत्तता.’
गांधीजी वैज्ञानिकांपेक्षा निराळे कसे होते?
    मग, ते शास्त्रज्ञांपेक्षा कोणत्या अर्थाने वेगळे होते? आपल्यापेक्षा कोणत्या बाबतीत वेगळे होते? गफलत करू नका. गांधीजींकडे वैज्ञानिक दृष्टिकोन होता किंवा त्यांनी विज्ञानाचा उपयोग केला म्हणून ते महान ठरत नाहीत. आपण सगळे ते करतोच, पण त्यामुळे आपण गांधी बनत नाही. विज्ञानाचा वापर तर सगळे करतात, ते तर सामान्य आहे. गांधीजींचे वेगळेपण कशात होते?
    एक म्हणजे, विज्ञान कोणत्या उद्देशासाठी उपयोगात आणले जाते तो उद्देश हा विज्ञानाचे मूल्यमापन करण्याचा त्यांचा मापदंड होता. विज्ञानाला अर्थपूर्ण हेतू असायला पाहिजे, असे त्यांना वाटत असे. ते काय म्हणतात बघा. ‘‘आधुनिक शास्त्रज्ञांमध्ये धगधगत असणाऱ्या संशोधन वृत्तीला मी नम्रपणाने वंदन करतो. त्या संशोधन वृत्तीशी माझे भांडण नाही. पण त्या वृत्तीने जी दिशा निवडली आहे त्याविरुद्ध माझी तक्रार आहे. कारण ते आपल्या ग्राहकांच्या निव्वळ ऐहिक प्रगतीला कारणीभूत असलेल्या निसर्गनियमांचा आणि पद्धतींचा शोध घेण्यात गुंतलेले आहेत.’’(5)
    गांधीजी वैज्ञानिकांची आणि त्यांच्या वैज्ञानिक वृत्तीची प्रशंसा करतात. परंतु त्यांची कौशल्ये आणि ज्ञान ते केवळ ग्राहकांच्या भौतिक प्रगतीसाठी वापरत आहेत, याबद्दल त्यांची तक्रार आहे. गांधीजींच्या मते हा खूप संकुचित आणि उथळ उद्देश होता. बरेचदा, विज्ञान त्यांच्या हातातले एक साधन बनते- ज्यांच्या हाती भांडवल असते. तिथे विज्ञान नफा कमविण्याचे यंत्र बनते. किंवा सरकारच्या हातात ते जुलूम आणि विनाशाचे हत्यार बनते. त्यामुळे बऱ्याचदा विज्ञान आणि वैज्ञानिकांमुळे भांडवलदार किंवा सरकार जास्त बलवान बनतात. पण विज्ञान हे सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक न्यायाचे साधन व्हायला पाहिजे, असे गांधीजींना वाटत असे. ते म्हणतात, ‘‘जोपर्यंत तुम्ही लावलेल्या सर्व शोधांमुळे गरिबांचे कल्याण होत नाही, तोपर्यंत तुमच्या प्रयोगशाळा सैतानाच्या कार्यशाळेपेक्षा काही वेगळ्या नसतील.’’ (6)
    जनतेचे कल्याण हाच अंतिम उद्देश असला पाहिजे, असे त्यांचे मत होते. ते सांगताना गांधीजी जराही सौम्य शब्द वापरत नाहीत. ते स्पष्टपणे म्हणतात की, ‘असे केले नाही तर तुमच्या सर्व प्रयोगशाळा सैतानाच्या कार्यशाळांपेक्षा वेगळ्या नसतील.’ ते आपल्याला अशा हादरवणाऱ्या शब्दांनी फटकवतात. आपले विज्ञान, प्रयोगशाळा, वैज्ञानिक कारकिर्द कोणत्या उद्देशाने वापरली जात आहे हे तपासण्यास ते आपल्याला भाग पाडतात.
    गांधी वेगळे होते. कारण त्यांनी विज्ञानाला सुखभोग व नफावृद्धीऐवजी सामाजिक परिवर्तन आणि न्यायाचे साधन मानले.
    स्वच्छता आणि शौचालयांची साफसफाई यांचे उदाहरण पाहू या. 1914 मध्ये गांधीजी भारतात आले तेव्हा उच्च वर्गाच्या किंवा वर्णाच्या व्यक्ती शौचालयाकडे पाहतदेखील नसत. समाजातील तथाकथित ‘घाणेरड्या’ म्हणजे भंगी लोकांकडून साफ केली जाणारी ती घरातील सर्वांत घाण जागा होती. गांधींनी आपल्या आश्रमात शौचालय स्वच्छ करण्याची प्रथा सुरू केली. प्रथम त्यांनी स्वतः ते काम केले आणि मग ती एक सामान्य प्रथा बनवली. शौचालय स्वच्छ करण्यासाठी त्यांनी विज्ञानाचा अवलंब केला.
    अशा प्रकारे, त्यांनी स्वच्छता साधली, आरोग्य प्राप्त केले आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जातिभेदापासून मुक्त होण्यासाठी एका मोठ्या सामाजिक सुधारणेला सुरुवात केली. स्वत:च्या शौचालयाची स्वच्छता सुरू करणारे आणि त्यातून सार्वजनिक आंदोलन उभारणारे ते पहिले राजकीय नेते असावेत. अगदी जवाहरलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद आणि वल्लभभाई पटेल हेदेखील जेव्हा त्यांच्या आश्रमात येत असत तेव्हा त्यांना स्वतःची शौचालये स्वच्छ करावी लागत असत. गांधींच्या ह्या भंगीमुक्ती चळवळीत महाराष्ट्रातील भावे, बापट आणि पटवर्धन या ब्राह्मणांनीही स्वतःचीच नव्हे तर इतरांचीही शौचालये साफ करण्यास सुरुवात केली.
    महाराष्ट्रातले आप्पा पटवर्धन नावाचे एक गृहस्थ गांधींच्या चळवळीत सामील झाले. ते सुवर्णपदक विजेते पदवीधर ब्राह्मण होते. त्यांना जेव्हा तुरुंगात टाकण्यात आले; तेव्हा ते ब्राह्मण असल्यामुळे इंग्रजांनी त्यांना शौचालय स्वच्छ करण्याचे काम दिले नाही. कारण तुरुंगाच्या नियमानुसार ब्राह्मणांना असे हलक्या दर्जाचे काम देता येत नसे. पण आप्पा पटवर्धन म्हणाले, ‘‘मी गांधींचा सैनिक आहे. स्वतःचे शौचालय स्वच्छ करणे हे माझ्या आयुष्यातील एक धर्मकार्य आहे. तुम्ही मला भंगीकामाची परवानगी दिलीच पाहिजे. ते माझे स्वातंत्र्य आहे.’’ ब्रिटिश सरकारने त्याला नकार दिल्याने त्यांनी उपोषण केले. लक्षात घ्या, भंगीकामासाठी उपोषण करणारा ब्राह्मण! शेवटी ब्रिटिश सरकारला माघार घ्यावी लागली. अशा प्रकारे गांधींनी शौचालयांची स्वच्छता या कार्यातून ‘स्वच्छ भारत’ हे उद्दिष्ट तर साधलेच, पण जातिभेदाचा अडथळाही पार केला. ही क्रांती होती!
    गांधीजी आणखी एका बाबतीत वेगळे होते. त्यांनी विज्ञानाला नैतिकतेची कसोटी लावली. वैज्ञानिक प्रगतीमुळे युरोपच्या नैतिकतेमध्ये किंचितही भर पडलेली नाही. त्यामुळे समाजातला द्वेष आणि अन्याय कमी झालेला नाही.(7) असे त्यांचे म्हणणे होते.
    युरोपमधील तत्कालीन विज्ञान, आज आपण ज्याला अमेरिकन विज्ञान म्हणू त्यावर गांधीजी अशी टीका करताहेत की, विज्ञानाच्या प्रगतीमुळे युरोपची नैतिक पातळी मुळीच उंचावली नाही. त्यामुळे द्वेष आणि अन्याय कमी झाला नाही; म्हणजे गांधीजींची अशी अपेक्षा आहे की विज्ञानामुळे समाजातला द्वेष, अन्याय कमी व्हावा आणि नैतिक दर्जा उंचावला जावा.
    त्यांची तक्रार आहे की, विज्ञान तसे करत नाही. गांधीजी विज्ञानाला नैतिक कसोटी लावतात. या दृष्टीने विज्ञान आणि वैज्ञानिक, किमान त्या काळी तरी अपयशी ठरले होते. आज त्यांची कामगिरी कशी आहे, त्याबद्दल आपल्याला आत्मपरीक्षण करावे लागेल.
    जिवंत प्राण्यांचे विच्छेदन ही गांधींच्या दृष्टीने विज्ञानाच्या नैतिकतेची एक कसोटी होती. शरीरशास्त्र किंवा प्राणिशास्त्राच्या ज्ञानासाठी ते आवश्यक मानले जात असे. गांधीजींना त्यांच्या किशोर वयात डॉक्टर व्हायची इच्छा होती. पण त्यांनी ते करिअर निवडले नाही. याचे एक कारण म्हणजे त्या काळी वैद्यकीय प्रशिक्षणात जिवंत प्राण्यांचे विच्छेदन आवश्यक मानले जाई; (त्यानंतर ऐंशी वर्षांनी मी मेडिकल शिक्षण घेतले तेव्हाही ते कायम होते. तो एक निर्दय, घृणास्पद अनुभव होता.) आणि गांधीजींचे मन त्याविरुद्ध बंड करून उठले. गांधीजींचा विरोध दोन कारणांसाठी होता. अगदी प्राण्यांच्या आतील गोष्टींचे ज्ञान मिळवण्याच्या हेतूनेही जिवंतपणी विच्छेदन करायला त्यांचा विरोध होता. प्राण्यांना होणाऱ्या वेदना, दुःख आणि मृत्यू हे एक कारण होते.
    पण दुसरे कारण म्हणजे जिवंत प्राण्याच्या विच्छेदनाचे क्रूर कृत्य करण्यामुळे शास्त्रज्ञावर होणारा परिणाम. जरी ते फक्त बेडूक, ससा, माकड, गिनीपिग असे प्राणी असले तरीही! त्यांना मारण्याचे कृत्य हे मानवावर केल्या जाणाऱ्या क्रूरतेपेक्षा आणि मानवाची हत्या करण्यापेक्षा काही फार निराळे नाही. गांधींनी व्हिव्हिसेक्शनचे समर्थन केले नाही, किंबहुना सक्रियपणे त्याचा विरोधच केला, कारण त्यामुळे वैज्ञानिकाच्या मानवी हृदयात क्रौर्याला प्रोत्साहन मिळते.
    आज प्राण्यांवरील क्रूरतेच्या विरोधात जागतिक चळवळ उभी राहिली आहे. पण शंभर वर्षांपूर्वी नेहरू, ऑल्डास हक्सले किंवा मेघनाद साहांसारखे विज्ञानवादी लोक गांधींना हसायचे. ते कदाचित म्हणत असतील की- अरे, हा माणूस विज्ञानविरोधी आहे, त्याला विच्छेदन नकोय, तो वैज्ञानिक कुतूहलाला मान्यता देत नाही! गांधीजी मृतदेहांच्या विच्छेदनाच्या विरोधात नव्हते, परंतु ते जिवंत प्राण्यांच्या विच्छेदनाच्या विरोधात होते. त्यांच्यासाठी हा नैतिकतेचा प्रश्न होता, त्यांच्या दृष्टीने विज्ञान हे नैतिकतेपासून दूर असू शकत नाही.
तुम्हाला काय वाटते?
    आपल्यासारखे विज्ञानवादी लोक आणि गांधी यांच्यात आणखी एक मोठा फरक आहे. विज्ञान हे स्वभावत:च काहीसे संकुचित म्हणजे reductionist आहे. शास्त्रज्ञाला ज्या गोष्टीचा सखोल अभ्यास करायचा असेल त्यावर तो आपल्या संशोधनाच्या साधनांसह सूक्ष्मपणे लक्ष केंद्रित करतो. त्यामुळे काय होते?
    एकदा मी एक व्यंगचित्र पाहिले होते. एक शास्त्रज्ञ गॅलरीत दुर्बीण घेऊन बसला आहे. आकाशात कुठे तरी धूमकेतू उगवणे अपेक्षित आहे. त्यामुळे धूमकेतू उगवण्याच्या दिशेचा अंदाज घेऊन शास्त्रज्ञाने आपली दुर्बीण त्या दिशेने केंद्रित केली आहे. तो वाट पाहतोय आणि दुर्बिणीतून आकाशाच्या एका अरुंद कोनातील भागाचे लक्षपूर्वक निरीक्षण करतोय. तेवढ्यात घरातील मोलकरीण चहाचा कप घेऊन येते आणि ती मोकळ्या आकाशाकडे पाहते. ती दुसरीकडे कुठे तरी बोट दाखवते आणि म्हणते, ‘अरेच्या, तो पाहा धूमकेतू!’ शास्त्रज्ञ चुकला आहे, कारण त्याने फारच कमी भागावर लक्ष केंद्रित केले आहे. ती मोलकरीण कदाचित अशिक्षित असेल, पण ती संपूर्ण आकाश पाहते आहे. म्हणून धूमकेतू इतरत्र उगवताना तिला दिसू शकतो.
    गांधीजी संपूर्ण आकाश पाहतात. संपूर्ण सत्य पाहतात. त्यांना फक्त एक संकुचित चित्र दिसत नाही, जीवनाचे एक खंडित दृश्य दिसत नाही. ते जीवनाकडे एकात्मिक सत्य म्हणून पाहतात. इथे प्रत्येक गोष्ट इतर सर्व गोष्टींशी जोडलेली आहे. त्यांनी खादीला प्रोत्साहन दिले होते तेच उदाहरण पाहा. खादी शेतकऱ्याच्या कापसाला बाजारपेठ उपलब्ध करून देते, सूतकताई करणाऱ्याला आणि विणकराला मजुरी देते, स्थानिक उत्पादन आणि वापराला प्रोत्साहन देते. म्हणजे स्वदेशी, आणि स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा देते. खादी उच्च वर्गातील लोकांना गरीब लोकांच्या जवळ आणते. एका खादीमधून ते एकाच वेळी अनेक परिणाम साधतात. असा त्यांचा एकात्मिक, सर्वांगीण दृष्टिकोन आहे.
ईशावास्यमिदं सर्वम्‌
    गांधीजी आणि आपल्यासारख्या विज्ञानवादी लोकांमधला आणखी एक फरक म्हणजे गांधींसाठी काहीही जड नाही! काहीही नुसतेच भौतिक, निर्जीव, मृत नाही. विश्वातील प्रत्येक गोष्ट जीवनतत्त्वाने व्यापलेली आहे.
    एकदा महात्मा गांधी अलाहाबादला गेले, तेव्हा जवाहरलाल नेहरूंनी त्यांना घरी जेवायला बोलावले. जेवण आटोपल्यानंतर हात धुण्यासाठी स्वतः जवाहरलाल गांधीजींच्या हातावर पाणी ओतत होते. त्याच वेळी ते आपसांत कोणत्या तरी राष्ट्रीय मुद्द्यावर बोलण्यात गढून गेले होते. गांधीजींचे हात धुण्याचे काम पूर्ण झाले तरीही जवाहरलाल मात्र गांधीजींच्या चेहऱ्याकडे बघत हातांवर पाणी ओतत राहिले.
महात्माजी म्हणाले, ‘जवाहर, तू पाणी वाया घालवतो आहेस.’
जवाहरलाल थट्टेने म्हणाले, ‘बापू, हे अलाहाबाद आहे. येथे गंगा आणि यमुना वाहतायत. पाण्याची काही कमतरता नाही.’
त्यावर गांधीजींचे उत्तर होते, ‘होय जवाहर, गंगा आणि यमुना इथे वाहतात, पण त्या तुझ्यासाठी वाहत नाहीत!’
    इथे त्यांनी जवाहरलालना आठवण करून दिली की, पाणी हा एक भौतिक पदार्थ जरी असला तरी त्यांना पाण्याचा एक थेंबदेखील वाया घालवण्याचा अधिकार नाही. इथली प्रत्येक गोष्ट पवित्र आहे. ‘ईश आवास्यम्‌ इदं सर्वम्‌’. इथली प्रत्येक गोष्ट परमात्म्याने, सत्य तत्त्वाने भारलेली आहे. हा त्यांचा दृष्टिकोन आपल्या दृष्टिकोनापेक्षा वेगळा आहे. आपण प्रत्येक गोष्टीकडे फक्त निर्जीव वस्तू म्हणून, जड म्हणून पाहतो. पण गांधीजी प्रत्येक भौतिक गोष्टीकडे पवित्र आणि ईश्वरमय म्हणून पाहतात. अशा प्रकारे, गांधीजींचे मोठेपण विज्ञानाच्या कक्षेबाहेर स्थित आहे. त्याला नैतिकतेचे परिमाण आहे.
    या नैतिक परिमाणाचा सारांश केवळ दोन शब्दांत सांगायचा तर- सत्य आणि अहिंसा. शंभूप्रसाद यांनी हे अतिशय छान मांडले आहे ते म्हणतात, ‘त्यांचा विज्ञानावर मोठा विश्वास असला, तरी या विश्वातील विज्ञानाची भूमिका काय असावी, याबद्दल त्यांना स्पष्टता होती. सत्य आणि अहिंसेपेक्षा त्यांनी विज्ञान वरचढ मानले नाही. अनेक तथाकथित वैज्ञानिक तथ्यांपेक्षा सत्य आणि अहिंसा त्यांच्यासाठी जास्त खरे होते.'
    त्यामुळे गांधीजींनी विज्ञानाचा जो उपयोग केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना, गांधीजींचे वैशिष्ट्य विज्ञानात नसून सत्य आणि अहिंसेत आहे- हे आपल्याला विसरून चालणार नाही. विज्ञान हे सर्वोच्च दैवत नाही, राम-सीतेच्या पायांशी बसलेला हनुमान आहे.
गांधींचे सत्य आणि त्यांचे विज्ञान
    गांधीजींच्या अहिंसेचे आणि सत्याचे काय विज्ञान आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करू या.
    ‘सत्य’ या संकल्पनेत अंतर्निहित असलेले विज्ञान काय आहे? वैज्ञानिक आणि गांधीजी यांचे ध्येय समान आहे; दोघेही सत्याचा शोध घेत असतात. गांधीजींच्या दृष्टीने सत्य हेच जीवनाचे अंतिम ध्येय आहे. सुरुवातीला ते म्हणायचे, ‘सत्य ईश्वराइतकेच महत्त्वाचे आहे’. नंतर ते म्हणू लागले, ‘सत्य हे ईश्वरासारखे आहे’. शेवटी ते म्हणू लागले, ‘सत्य हाच ईश्वर आहे’. काय विधान आहे! एक श्रद्धावान आणि धार्मिक व्यक्ती हे म्हणते आहे! यातून असा अर्थ होतो की, सत्याशिवाय दुसरा ईश्वर नाही.
    सत्य हाच ईश्वर आहे. हीच गांधीजींची सत्याविषयीची भूमिका आहे.
    जीवनातील भौतिक पैलूंचा शोध घेण्यासाठी गांधींनी तराजू, सूक्ष्मदर्शक आणि दुर्बिणीसारख्या वैज्ञानिक उपकरणांचा वापर केला. पण सत्याच्या नैतिक किंवा आध्यात्मिक पैलूंना स्पर्श करण्यासाठी त्यांच्याकडे दुसरी पद्धत होती. ती पद्धत कोणती होती? त्याविषयी त्यांनी 1929 मध्ये बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या विद्यार्थ्यांना काहीशी कल्पना दिली. ते त्यांना काय सांगतात ते पाहा- ‘‘मी तुम्हाला सांगतो, तुम्ही अतिशय उत्तम वायरलेस साधन तयार करू शकता, पण त्यासाठी बाह्य संशोधनाची गरज नसून आंतरिक संशोधनाची आवश्यकता आहे. आंतरिकशी संबंध नसेल तर सर्व (बाह्य) संशोधन निरुपयोगी ठरेल.’’(9) या आंतरिक संशोधनासाठी त्यांच्याकडे दुसरे एक साधन होते. ते काय होते?
    राजगोपालाचारी यांच्याशी झालेल्या एका चर्चेदरम्यान त्यांनी सांगितले की, उपवासाच्या कलेमध्ये पारंगत असलेली त्यांची आई त्यांना वैज्ञानिकासारखीच वाटते. का? तर, ‘जो शुद्ध आहे, जो सत्याला चिकटून आहे आणि सत्यालाच चिकटून राहू इच्छितो तो एखाद्या भौतिक-शास्त्रज्ञाइतकाच वैज्ञानिक आहे.’(10) भौतिकशास्त्रज्ञ अर्थातच सर्वांत शुद्ध वैज्ञानिक आहे, परंतु गांधी म्हणत आहेत की त्यांची आई जवळजवळ तशीच होती. कारण ती शुद्ध होती. उपवास करून तिने स्वतःला शुद्ध केले.
    इथे आपल्याला गांधींच्या पद्धतीची थोडी झलक मिळते. सत्याचे आध्यात्मिक आणि नैतिक पैलू जाणून घेण्याची गांधींची पद्धत आत्मशुद्धी करण्याची होती. त्यांचे ‘एकादश व्रत’ हे अकरा नियम आणि अकरा प्रतिज्ञा यांनी बनलेले होते. हे सर्व आचार, मन आणि जीवन शुद्ध करण्यासाठी होते. याव्यतिरिक्त त्यांनी स्वतःला शुद्ध करण्यासाठी, स्वत:चे मन शुद्ध करण्यासाठी उपवासाचा उपयोग केला. आणि शेवटी येते प्रार्थना. प्रार्थना म्हणजे काय? तर ‘माझ्या सामर्थ्याची एक मर्यादा आहे, जिच्या पलीकडे मी जाऊ शकत नाही;’ ह्याची जाणीव व स्वीकृती म्हणजे प्रार्थना. म्हणून मी शरणागती पत्करतो, मी सत्याच्या प्रतीकाची, रामनामाची प्रार्थना करतो.
    तुम्ही स्वतःला शून्य बनवू शकलात, तर तुमचा अहंकार शून्य होतो. आता तुम्ही सत्य जाणू, स्वीकारू शकता. तुमचे मन निर्मळ व तुमचे जीवन स्वच्छ व्हायला हवे. गांधींनी स्वतःला तसे बनवण्याचा प्रयत्न केला. मनाच्या त्या शुद्ध आणि स्वच्छ स्थितीत, तुमच्या अहंकारशून्य हृदयाच्या आरशात जे दिसते, ते नैतिक सत्याचे प्रतिबिंब आहे. गांधी याला ‘आतला आवाज’ म्हणतात. चौरीचौरा प्रकरणामुळे जेव्हा त्यांनी राष्ट्रीय आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा ते म्हणाले, ‘‘माझा आतला आवाज मला सांगतो की तू चुकलास. संपूर्ण जग माझ्या विरोधात गेले तरी मी माझ्या आतल्या आवाजाचे अनुसरण करीन.’’ तो आतला आवाज त्यांच्यासाठी ईश्वराचा संदेश किंवा विवेकाचा आवाज होता.
    गांधींजी त्या सत्याशी एका विशिष्ट पद्धतीने संपर्क साधत असत. तो काही चमत्कार किंवा अपघात नव्हता, त्यांची एक पद्धत होती- तुमचे बोलणे शुद्ध असले पाहिजे, ते सत्य असले पाहिजे, वर्तन अहिंसक असले पाहिजे, तुम्ही ब्रह्मचर्य पाळले पाहिजे, शिस्तबद्ध आणि संयमी जीवन जगले पाहिजे. शरीरश्रम, उपवास, प्रार्थना आणि शेवटी ईश्वराला समर्पित होणे हे एक प्रकारे तुमच्या चश्म्याचे लेन्स साफ करण्यासारखे आहे. अशा निर्मळ अवस्थेत तुम्हांला सत्याचे दर्शन होते.
    अर्थातच, हे आपल्याला समजत नाही. ते आपल्याला गूढ, अगम्य वाटते. आपल्याला मोजमापाच्या आणि पडताळणीच्या फक्त भौतिक पद्धती माहीत आहेत. आपले मन स्वच्छ करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे नसतात. कशाला त्रास घ्यायचा? आपण आपले शरीर स्वच्छ करतो, पण आपले आचरण, आपले मन स्वच्छ करत नाही. म्हणून आतल्या आवाजासारख्या गोष्टींबद्दल बोलणाऱ्या गांधीजींना शास्त्रज्ञांनी आणि बुद्धिजीवी लोकांनी सोईस्करपणे अंधश्रद्धाळू असे लेबल लावले. आपण आतल्या आवाजाशी कनेक्ट होऊ शकत नाही, म्हणून आपण म्हणतो की कोणीच तसे करू शकत नाही. परंतु या विशिष्ट प्रकारच्या प्रक्रियेतून गांधीजी नैतिक आणि आध्यात्मिक सत्यापर्यंत पोहोचले, पोहोचू शकत होते.
अहिंसेचे विज्ञान
हे संपूर्ण भाषण वाचण्यासाठी लिंक :

Comments